रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

वाचन प्रेरणा दिवस काळाची गरज





आज १५ ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन.
     त्याच्या स्मरणार्थ हा दिवस "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून २०१५ पासून सर्वत्र साजरा केला जात आहे. वाचन संस्कृती शालेय जीवनापासूनच रुजावी. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. म्हणून या दिवसाकडे पाहिले पाहिजे.
 आज आपण शालेय विद्यार्थ्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की अभ्यासाशिवाय पुस्तक वाचताना दिसत नाहीत. (काही ठिकाणी हा अपवाद आहे. ) यामुळे भारतीय प्राचीन ग्रंथातून मिळणारे संस्कारक्षम ज्ञान बाजूला झाले आहे. उत्तम जगण्याच्या जीवनशैली चे अनेक उदाहरणे रामायण महाभारत ग्रंथातून मिळतात. असे अनेक ग्रंथ संपदा आपल्याकडे आहे. असे पुस्तके वाचनाची आवड नसल्याने मिळत नाहीत. म्हणून या पिढीला आदर्श मुल्य कशी मिळणार ? हे अवघड झाले आहे.
 मुलांवर संस्कार होणे अत्यंत आवश्यक गोष्टी मोबाइल, टि.व्ही मुळे कठीण होत आहे. यातून मुलांच्या मनावर परिणाम होत आहे. पूर्वी आई- बाबा, आजी-आजोबा मुलांसोबत गप्पा मारत असताना संस्कारक्षम कथा, गोष्टी, प्रसंग सांगते जात होते. मुलांना संस्कारक्षम करणारी कुटुंब व्यवस्था च दुभंगलेले आहे.
 म्हणून वाचन संस्कृती तून विद्यार्थ्यावर संस्कारक्षम वाचन साहित्य देवून हे साध्य करता येईल का? यामध्ये प्रवास वर्णन, ललित साहित्य, कथा, कांदबरी, व्यक्ति चरित्र असे विपूल साहित्य आहे.
महाराष्ट्रात अनेक शाळेतून वाचू आंनदे,अवांतर वाचन अश्या तासिकाच  शालेय वेळापत्रकात सहभागी केलेल्या आहेत. स्वंतत्र ग्रंथालयात अनेक पुस्तके उपलब्ध करून दिले जात आहेत.
यातूनच एक संस्कारक्षम व संस्कृती संवर्धन करणारी एक पिढी निर्माण होईल. हि काळाची गरज आहे. अनेक पुस्तकांमुळे अनेकांच्या जीवनात फार मोठी क्रांती झालेली आहे.
वाचनातून आत्मविश्वास, शब्दसंग्रह, लेखन कौशल्य, संवाद शैली, संभाषण उत्तम होते. संस्कार व वैचारिक प्रगल्भता जगविण्यासाठी वाचन संस्कृती ची जोपासना करणे आवश्यक आहे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
                          ©  दत्ता केशवराव माने
                       जनकल्याण निवासी विद्यालय,
                                 हरंगुळ (बु) लातूर

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

श्री कुत्रोबा प्रसन्न नाईचाकूर

कुत्रा ग्राम दैवत असणारे नाईचाकूर

भारतीय संस्कृती ही भूतदया जोपासणारी संस्कृती आहे. आपल्या थोर संत, महात्म्यांनी सुध्दा वेगवेगळ्या प्रसंगातून, माध्यमातून हाच संदेश दिला आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण असोत अथवा ससिक रक्षण करणारे आदुसेने कुत्र्यास का मारले म्हणून खेद व्यक्त करणारे चक्रधर स्वामी असोत किंवा "भूता परस्परे जो मैत्र जिवांचे म्हणनारे ज्ञानेश्वर महाराज अथवा कुत्र्याचे पोट नुसती पोळी खाल्ले तर दुखेल म्हणून तुपाची वाटी घेवून कुत्र्याच्या पाठीमागे धावणारे नामदेव महाराज असोत. भुतांचे पालन करा म्हणनारे संतश्रेष्ठ तुकोबाराय हे सर्वजन प्राणीमात्राचे संगोपन करण्याची शिकवण देतात. 
      या संताची शिकवण जोपासणारे गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील स्वता:ची वेगळी ओळख जोपासणारे 'नाईचाकूर' 
    नाईचाकूर हे गाव तसे पाहिले तर महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात व निजाम स्टेट मधील एक महत्वाचे गाव. या गावच्या नावाचा इतिहास हाच एका दंत कथेवर मोठा मनोरंजक आहे. 'नाई' या मुळच्या कन्नड शब्दाचा अर्थ कुत्रा असा होतो. म्हणजे कुत्राच्या नावाची ओळख जोपासणारे गाव म्हणजे नाईचाकूर. चाकूर या नावाची इतरही गावे आहेत. पण या ठिकाणच्या आख्याइकेनुसार महाभारत काळात चक्रपूर नावाची नगरी ही होती. त्या नगरीतच भीमाने बकासूर राक्षसाला ठार मारले असे येथील लोकांचे म्हणणे आहे. 
     या चक्रपूर अथवा चक्रवर्ती नगरीत एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला तीर्थ यात्रेला जायचे होते. पण प्रवासासाठी पैसे नव्हते. काय करावे? हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला. जवळच असलेल्या १० कि. मी. अंतरावरील हाडोळी गावातील सावकाराकडून त्याला ही रक्कम मिळण्याची शक्यता होती. पण त्याच्याकडे तारण ठेवण्यासारखी एकही मौल्यवान वस्तू या गरीब शेतकर्याकडे नव्हती. हा एक बाब त्याच्याकडे प्राणाहूनही प्रिय होती ती म्हणजे त्याच्या हुशार प्रामाणिक लाडका असणारा कुत्रा. पण कुत्रा गहाण ठेवणे ही कल्पनाच हास्यास्पद होती. तरीही त्या शेतकर्यांने सावकाराकडे कुत्र्याला गहाण ठेवले. व काही रक्कम कर्ज म्हणून घेवून तो तीर्थयात्रेला गेला. 
         इकडे त्याच दरम्यान त्या कर्जदात्या सावकाराच्या घरी मोठी चोरी झाली. चोरांनी भरपूर धन साठविलेल्या मोठ-मोठ्याल्या पेट्या पळविल्या आणि जवळच असलेल्या ओढ्याच्या डोहात टाकल्या. सुर्योदय होतातच सावकाराच्या लक्षात आले की आपल्या घरी वाड्यात मोठी चोरी झालेली आहे. गाव सारे सावकाराच्या वाड्यात आले. शेतकर्यांचा कुत्रा विशिष्ट दिशेकडे तोंड करून भूंकू लागला. त्याच्या भुंकण्याकडे काही जानकारी लोकांनी लक्ष दिले. कुत्रा ओढ्याच्या बाजूला जावू लागला. या कुतुहलापोटी काहीजण कुत्र्याच्या मागे मागे गेले तर चोरांनी ज्या डोहात उड्या मारून पाहिले. तर आत सावकाराच्या धनाच्या पेट्या सापडल्या. सावकाराला फार आनंदित झाले. त्याने कुत्र्याच्या गळ्यात चिठ्ठी बांधून मला माझी रक्कम मिळाली तू कर्ज देण्यासाठी येवू नको म्हणून कुत्र्याला कृतज्ञतेपोटी पाठवून दिले. 
  कुत्रा चक्रपूराकडे निघाला गावशिवारातील ओढ्याजवळ आला. तेवढ्यात कर्जफेड करण्यासाठी रक्कम घेवून निघालेला शेतकरी, कुत्र्याचा धनी यांची ओढ्याजवळच भेट झाली. शेतकर्याला धक्का बसला कारण त्याच्या इमानाला बट्टा लागला. हा "कुत्रा पळून आला - मी खोटा ठरलो " असे समजून शेतकर्याने प्रामाणिक कुत्रा जवळ येताच भला मोठा दगड उचलून कुत्र्याच्या डोक्यात घातला. कुत्रा जागेवरच गतप्राण झाला. 
    आडवा पडलेल्या कुत्राच्या गळ्यातील चिठ्ठी पाहिले. हि चिठ्ठी घेऊन शेतकरी सावकाराच्या घरी गेला. सावकाराने सर्व हक्कीखत सांगितले. शेतकऱ्याला वाईट वाटले. सावकाराचे धन मिळवून देणार्या, मालकाची इमाने -इतबारे सेवा करणार्या इमानी निष्प्राण देवाजवळ धाय मोकलून तो रडू लागला. पण रडणे व्यर्थ. पडल्या ने तो कुत्रा काय परत येणार नव्हता. ज्या ठिकाणी कुत्रा गतप्राण झाला तेथील दगडाची अाजही पुजा केली जाते. आणि त्याचीच आठवण म्हणून शेतकर्याच्या गावात गावकऱ्यांनी कुत्र्याचे मंदिर उभारणी केली. दगडाची कोरीव मूर्ती त्यावर तांबे धातूची पत्राची प्रतिकृती रेखून (मढवून) नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाते. इतकेच नव्हे तर या गावचे "ग्राम दैवत "च कुत्रा आहे. 
     कुत्र्याचे मंदिर उभारणारे गाव आणि शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ वाघ्याची स्मृती जपणारे स्मारक हे अपवादात्मक सापडणारी उदाहरणे आहेत. 
   अशा कुत्र्याच्या (नाई) नावावरून आणि चक्रपूर चा कालौघात झालेले चाकूर होय. 
नाईचाकूर बनलेले गाव ३० सप्टेंबर१९९३ च्या भूकंपात उध्वस्त झाले. मुळ गावाचे नविन ठिकाणी पुनर्वसन झाले. पुनर्वसित गावातही "कुत्रोबा मंदिर" गावकर्यांनी मोठ्या श्रध्देने उभारलेले आहे. 
   एकेकाळी पांढर्या मातीच्या मोठ्या ढिगार्यावर असणाऱ्या गावात अजून ही मोठ्या प्रमाणात लाल रंगाची मडकी(सगळीपालथी) सापडतात. सातवाहन काळातील विटा सापडतात. (लाल मोठ्या चौरसाकृती) काही संशोधन, उत्खनन करण्याची यातून निश्चितच इतिहासाला धागेदोरे मिळतील. 
    मराठवाडा मुक्तीसंग्रामात पंचक्रोशीचे नेतृत्व केले. ८५ पेक्षा अधिक स्वांतत्र्य सैनिकांनी योगदान दिले. 
असे ऐतिहासिक काळातील चक्रवर्ती नगरी तेे नाईचाकूर

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

मराठवाडा मुक्तीसंग्रामात नाईचाकूर चे योगदान

मराठवाडा मुक्तीसंग्रामात नाईचाकूर चे योगदान

15 ऑगस्ट 1947! भारताला स्वातंत्र्य मिळाले,पण हैदराबाद संस्थान मात्र अजूनही पारतंत्र्याच्या अंधकारात होते. परवशतेचा पाश अधिक घट्ट होऊ पाहत होता,पण मराठवाड्यातील जनतेने  निजामाची जुलमी राजवट उखडून टाकली,त्यासाठी मोठा संघर्ष केला "रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?" या न्यायाने संघर्षामुळेच हैदराबादेवर तिरंगा फडकला,यात स्वातंत्र्यलढ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील नाईचाकुर गावाचा सहभागही मोलाचा होता.
  भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी हैद्राबाद संस्थानात निजामी जुलमी राजवट होती. त्यांनी हिंदूवर अनंत अत्याचार केले जात होते. निजामाने आपल्या अत्याचारांसाठी वापर केला. तो 'इत्तेहादुल मुसलमीन' संघटनेचा कासिम रझवी हा   .
याने या अंतर्गत  'रझाकार' नावाची संघटना काढली. ही निमलष्करी संघटना होती. सैनिकी वेश परिधान करून धारदार फावडे हातात घेऊन रझाकार फिरायचे. मुलींची अब्रु असुरक्षित झाली होती. बलात्कार करणे,एकटयास गाठून हत्या इत्यादी कृत्य रझाकार करत होते. अशा या जुलमी रझाकार संघटेनेचा प्रमुख कासिम रझवी होता. एकार्थाने तो हिंदूंचा कर्दनकाळच म्हणावा लागेल. धर्माच्या नावाखाली चालणारी संघटना असलेल्या मुळे बहूसंख्य मुस्लिम समाज रझाकारांना पाठिंबा देत होता.

अत्याचारी शासनास पायदळी तुडविण्याचे सामर्थ्य ही जनतेत असते. परंतु त्यासाठी आवश्यक असते. संघटन खंबीर , नेतृत्व व सर्वस्वी समर्पणाची तयारी संघटनात्मक बांधणी संघर्षासाठी विविध संघटनेच्या माध्यमातून केले जात होते. यामध्ये आर्य समाज, किसान दल, हैद्राबाद  स्टेट कॉग्रेस, हिंदू महासभा, आदि संघटनांचे कार्य सुरू होते.
  रझाकारांचे अत्याचार वाढतच होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हैद्राबाद मुक्तीसंग्रामात मोलाचे योगदान राहिले आहे. या आंदोलनाची सुरूवात १९२५ साली निजामानी गावातील हेमाडपंती मंदिर पाडले. या मंदिर परिसरात अनेक देव -देवतांच्या अनेक मुर्त्या होत्या. त्यापैकी एक देवीची मूर्ती गावातील काही मंडळीने मुर्ती ची विटंबना होऊ नये म्हणून एका शेतकऱ्यांच्या शेतात खोकला माॅ म्हणून प्रस्थापित केले. तसेच या मंदिराचे कोरीव -रेखीव दगड आजही विविध ठिकाणी उत्खननात मिळतात. या ठिकाणी 'निजाम पोलिस ठाणे' तयार करून अत्याचारास अधिक तिव्रतेने सुरूवात केली. या प्रतिकाराची गावातील दोन पिढ्याचे  योगदान राहिले.
-  हैद्राबाद संस्थानात स्वांतत्र्य आंदोलनाची उभारणी करण्याचे कार्य आर्य समाजाने केले. सामाजिक, राजकिय, आर्थिक, धार्मिक सुधारणा घडवून आणणे हे आर्य समाजाचा मूळ हेतू होताच म्हणून १९३५ मध्ये नाईचाकूर गावातील युवकांच्या आग्रहाने मंदिराची स्थापना झाली.युवकांना शारिरीक, बौद्धिक तसेच राष्ट्रभक्तीचे धडे दिले जावू लागले.
 -  प.पू.शंभोगिरी जी महाराज यांच्या नेतृत्वाखाली उमरगा येथे आंदोलन केले होते. या आंदोलनात ५०० ते ६०० क्रांतिकारक सहभागी झाले होते. यामध्ये उमरगा परिसरातील तसेच नाईचाकूर पंचक्रोशीतील क्रांतीकारक सहभागी झाले होते. यामध्ये नाईचाकूर च्या क्रांतीकारकांना पकडण्यासाठी आलेल्या ५ रझाकार पठाणास ठार मारून भूमिगत झाले.
-राष्ट्रीय शाळा :-
        राष्ट्रीय विचारांच्या अनेक ठिकाणी शाळांची सुरूवात करण्यात आली. यांचे अनुकरण करून गोविंद पवार व अन्य गावातील क्रांतीकारकांनी गावात शाळा सुरू केले होते. हे निजाम ठाणेदार अमीन साहेबाला समजले. त्यांनी 'सरकार द्रोहाचा' आरोप ठेवून शाळेतील विद्यार्थी, पालक यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शाळा बंद करावी लागली.
-  किसान दल संघटन :-
      ४जुलै१९४९  उमरगा येथील हंद्राळ या गावी रझाकार व पठाण कर वसुलीसाठी गावात आले होते. यांच गावात बिराजदाराच्या वाड्यात किसान दलाचे वीर माणिकराव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सुरू होती. यावेळी रझाकारांनी वाड्याला वेढा दिला. येथील क्रांतीकारकांनी प्रतिकार करून डोंगरावर पलायन केले. व ते या  गावातून बाहेर पडले. यानंतर भूमिगत राहून कार्य करणारा कुमार व युवकांचा मोठा गट तयार झाला.  या दलाच्या माध्यमातून गावात युवकांना हत्यारे तयार करणे, तलवार चालवायला शिकवणे, भालाफेक, बंदुका चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जावू लागले. आदिचे प्रशिक्षण गावात दिले जावू लागले. यांचे नेतृत्व कॅप्टन नामदेव पवार, गोविंद पवार, शाहूराज जाधव यांचे सहकारी हे काम करत होते.
- वंदे मातरम् आंदोलन :-
          हैद्राबाद संस्थानात  वंदे मातरम् गीत म्हणण्यास बंदी होती. या विरोधात आंदोलन चालू होते. या कालावधीत १९३८ मध्ये समर्थन म्हणून क्रांतीकारकांनी झेंड्याचा ओटा येथे सामूहिक वंदे मातरम् गीत गायन केले. यावेळी पोलिसांनी तुफान लाठीमार केला.
- जंगल सत्याग्रह :-
        संस्थानात शिंदीच्या झाडांपासून मद्य तयार केले जात होते. हे सरकारी उत्पन्नाचे मोठे साधन होते. शेतकऱ्यांच्या खाजगी शेतात असलेली झाडे सुध्दा सरकारचे लोक घेत होते. १९४७ साली हैद्राबाद संस्थानात सर्वत्र जंगल सत्याग्रह करण्यात आले. मोठ्या संख्येने विविध ठिकाणी सत्याग्रह झाले. याच कालावधी साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांची नाईचाकूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. हि सभा नाईचाकूर- सरवडी च्या मध्यभागी काही एकर शिंदीचे बन होते. याच बनात सभा झाली. पुढिल आंदोलनाची दिशा निश्चित ठरवण्यात आली. काही दिवसात गावातील युवकांनी हे शिंदीचे बन तोडून फेकून दिले. हजारो रूपयाचे उत्पन्न रातोरात नष्ट केले. या सोबत शिंदी जमा करणारी केंद्रे नष्ट केले, दारूच्या भटट्या पाडून टाकण्यात आल्या.पैसा लुटून स्वातंत्र्याच्या कामासाठी वापर केला.
- महिलांचे योगदान:-
        भूमिगत असणाऱ्या क्रांतीकारकास भोजन पुरवणे, निरोप, विविध पत्रके पोहचवणे, आंदोलकांना आश्रय देवून सांभाळ करणे, या बरोबर भूमिगत क्रांतीकारकांच्या परिवाराची काळजी घेणे. निजाम साहेबाच्या बायकांसोबत चर्चेतून महत्त्वाची माहिती क्रांतीकारकास पुरवणे असे अनेक महत्त्वाची कामे महिलांनी केले.
- इस्माईल मेहबूब मुल्ला हा रझाकाराचा विश्वासू व्यक्ति होता. गावातील महिला, क्रांतीकारकांच्या घरातील लोकांना त्रास देवू लागला. महिलांची अब्रु लुटू लागला. यामुळे क्रांतीकारक प्रचंड चिडले १० जून १९४८ रोजी मध्य रात्री त्याला ठार करण्यात आले. या मध्ये रामचंद्र जहागिरदार, तुळशीराम सांळुके, तुळशीराम धनगर सहभागी होते.
- पोलिस ठाण्यावर हल्ला :-
        नाईचाकूर गावात मोठे पुलिस ठाणे होते. निजाम सरकारने आपल्या संस्थानातील नागरिकांना हत्यार वापरण्यास बंदी घालण्यात आली. यावेळी नाईचाकूर पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक घरातील झडती घेऊन हत्यारे जप्त करण्यात येवू लागले. तीच हत्यारे रझाकार संघटनेला पुरविली जाणार होती. नाईचाकूर ठाण्यात गोळा केलेल्या हत्यारात ३०० बंदुका. एक गाडी तलवारी होत्या. हे सर्व साहित्य रझाकारांना दिले जाणार होती. म्हणून १५ जानेवारी १९४८ रोजी रात्री १२ च्या सुमारास पंचक्रोशीतील क्रांतीकारकांनी हल्ला करून पोलिस ठाणे लुटले. यांचे नेतृत्व हाडोळीचे  मोहन पाटिल, नाईचाकूर येथील गोविंद पवार, शाहूराज जाधव, राम पवार, व्यंकट माने यांनी केले.
या सोबतच झेंडा सत्याग्रह, हात बॉब तयार करणे, आलुरच्या निजामी मिलिटरी ठाण्यावर हल्ला, घोळसगाव जेल मधील पोलिसांवर हल्ला, व्यापारी लुट, घोरवडी रझाकार केंद्रावर हल्ला, अशा अनेक आंदोलनात नाईचाकूर गावातील व्यंकट जयवंता पवार
माणिक (कारभारी) देवराव पवार. तुळशीराम साळुंके (व्हगाडी)   सुग्रीव(दादा) हाणमंत पवार
जयपाल आदप्पा कांक्रबे, सदानंद सनातन, माणिक पवार, शंकर लंकडे, काॅ. हिरा पवार, नामदेव पवार, सोपान माने, महादा सनातन, शाहुराज जाधव, गोविंद पवार,  किसन तुकाराम पवार, नागनाथ पवार, नाभीराज जमालपुरे, माणिकराव पवार,  बाबुसिंह पवार, शंकर सनातन,  तुळशीराम काळे, बाबाराव भोसले, किसन महादेव पवार, व्यंकट भाई माने, किसन तात्याराव  पवार, व्यंकट गोपाळ पवार, राम बापु पवार, मनोहरसिंह पवार, माणिक सगर, बाबु पांडुरंग इटुबोने, तुकाराम इटुबोने ,रंगराव कदम ,डिगबंर कुलकर्णी,  पांडूरंग बाबळसुरे, तुळशीराम साळुंके आदिने  क्रांतीकारकांनी या लढ्यात नेतृत्व करून मोलाचे योगदान दिले.
       अशा गावोगावी चाललेल्या आंदोलनाचा लढ्याचा परिणाम म्हणजे १३ ते १७ सप्टेंबर १९४८ या कालावधीत १०९ तासाचे ऑपरेशन कबड्डी, पोलो, टक्कर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर हैद्राबाद संस्थानच्या निजामाने शरणागती पत्करली आणि भारतात विलिन करून घेतले. मराठवाडा स्वंतत्र झाला.
या मुक्ती संग्रामात सहभागी सर्व ज्ञात अज्ञात , क्रांतीकारकास, हुतात्म्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांचे शौर्य, बलिदान, कार्यामुळे मराठवाड्याचे काश्मीर झाले नाही. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सर्व क्रांतीकारकास विनम्र अभिवादन !!!
संदर्भ ग्रंथ :
१) लातूर -उस्मानाबाद गॅझेट       - महाराष्ट्र शासन
२) हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम      - वसंत पोतदार
३) हैदराबाद मुक्ती लढा आणि
     हैदराबाद संस्थान              - प्रा. डॉ. चंद्रशेखर लोखंडे
४) मराठवाडा मुक्तीसंग्राम
   एक मागोवा                    -संपादन - सुधीर देशपांडे
५) मराठवाड्यचे क्रांतिसिंह
    गोविंदराव पवार       -     प्रा. राजेंद्र इंगळे,प्रा.शांता पवार
६) दैनिक एकमत, लोकमत,
 सकाळ,              -   १७ सप्टेंबर २०१२

   दत्तू केशव माने
जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु) लातूर
  dattakmane@gmail.com